मुंबई -लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी - बाळासाहेब थोरात - बाळासाहेब थोरात
भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
थोरात म्हणाले, की भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी आणि शाह यांचे अंतिम ध्येय आहे. संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, हे पाहत आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता साम, दाम,दंड, भेद नितीचा वापर सर्रास सुरू आहे. गोवा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश येथे हीच निती वापरुन भाजपने सत्ता मिळवली.
भाजपने काँग्रेस आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून आणि पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. ही लोकशाहीची गळचेपी असून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करुन भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.