मुंबई -बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला ( Rashmi Shukla Case Filed ) आहे. त्यानंतर आता याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारने कोणतीही दिरंगाई न करता शुक्लांवर कठोर कारवाई करावी. तसेच, रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचे आदेश देणाऱ्या ‘बिग बॉस’चा शोध घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना केली ( Atul Londhe On Phone Tapping Case ) आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू यांच्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत, एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप केल्याचे समोर आले आहे. त्याप्रकरणात रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, त्यांनी आणखी कोणा-कोणाचे फोन टॅप केले. तसेच, कोणाच्या सांगण्यावरुन रश्मी शुक्लांनी हे टॅपिंग केले, हे समोर येणे गरजेचे आहे. ही व्याप्ती व्यापक असल्याने तत्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.