मुंबई -सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरामुळे (fuel price increase) सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामधून सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवर दहा रुपये तर, डिझेल वर पाच रुपये दर कमी केले. हे दर कमी केल्यानंतर राज्य सरकारने देखील आपला वॅट कमी करून राज्यातील जनतेला इंधन दरवाढ संदर्भात काहीसा दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली असतानाच राज्य सरकारमध्ये असलेले काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आरिफ नसीम खान (Arif Naseem khan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांना इंधन दर कमी करावेत यासाठी पत्र लिहिल आहे. नसीम खान यांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे महा विकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi) घरचा आहेर मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा -Political Analysis : उत्तर प्रदेश निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायेत का?
पंजाब राजस्थानच्या सरकार प्रमाणे निर्णय घ्यावा
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. मागील सात वर्षांत पेट्रोल डिझेलचे दर (petrol diesel price) वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला, त्याच पद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.