महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसच्या भाई जगतापांची विधानपरिषदेवर जाण्याची संधी हुकणार? - vidhan parishad election

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजपाला याचा फायदा होणार असून काँग्रेसला याचा फटका बसणार आहे. विशेष करून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व विधानपरिषदेत सदस्य असलेले भाई जगताप यांची पुन्हा आमदार होण्याची संधी हुकणार आहे.

विधान परिषद इलेक्शन
विधान परिषद इलेक्शन

By

Published : Jul 14, 2021, 3:14 PM IST

Updated : Jul 14, 2021, 3:53 PM IST

मुंबई - मुंबई महापालिका निवडणूक सहा महिन्यावर आली आहे. त्याआधी महापालिकेतून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या दोन जागांची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजपाला याचा फायदा होणार असून काँग्रेसला याचा फटका बसणार आहे. विशेष करून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व विधानपरिषदेत सदस्य असलेले भाई जगताप यांची पुन्हा आमदार होण्याची संधी हुकणार आहे.

हेही वाचा -2024 मध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष असेल, स्वबळाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील - नाना पटोले

काँग्रेसला फटका

महाराष्ट्राच्या विधिमंडळातील विधान परिषद या सर्वोच्च अशा सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मुंबईतून दोन सदस्य निवडून दिले जातात. पालिकेतून डिसेंबर 2015मध्ये शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप हे निवडून गेले होते. त्यांची मुदत डिसेंबर 2021मध्ये संपत आहे. त्यामुळे डिसेंबर 2021मध्ये ही निवडणूक होईल. या निवडणुकीत मतांचा कोटा ठरविण्यात येतो. एका उमेदवाराला पहिल्या पसंतीची 77 मते मिळवावी लागतील. मुंबई महापालिकेत पक्षीय बलाबल पाहिल्यास सध्या ही आकडेवारी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाकडे असल्याने या दोन्ही पक्षाचे उमेदवार विधानपरिषदेवर निवडून जातील. काँग्रेसकडे लागणारे संख्याबळ नसल्याने त्याचा फटका काँग्रेसला व विशेषकरून भाई जगताप यांना बसणार आहे.

भाजपाला फायदा

मुंबई महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपाकडे 32 नगरसेवक होते. त्यावेळी काँग्रेसचे 50 नगरसेवक असल्याने लागणाऱ्या 77च्या आकड्याची जुळवाजुळव करणे काँग्रेसला शक्य झाले होते. आता शिवसेनेकडे 96 तर भाजपाकडे 83 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसकडे 29 नगरसेवक आहेत. राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे भाई जगताप उभे राहिले तर शिवसेना त्यांना मदत करेल का, हा प्रश्न आहे. काँग्रेसने शिवसेनेशी जुळवून घेतले तरी काँग्रेसचा एक सदस्य निवडून येणे कठीण दिसते. पालिकेत शिवसेना 97 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पार्टी यांची 43 अशी या सर्वांची मिळून 140 मते आहेत. शिवसेना उमेदवाराला त्यांच्याकडे असलेल्या 97 मतांपैकी पहिल्या पसंतीची 77 मते मिळाली तरी उर्वरित 27 मते काँग्रेसला देऊनही त्यांना 7 मते कमी पडतील. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा सदस्य पालिकेतून निवडून जाण्याची शक्यता अधिक आहे, असे पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा -नानांच्या बोलण्यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही - शिवसेना

काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात

महापालिकेतून दोन सदस्य विधापरिषदेवर निवडून जातात. यावेळी काँग्रेसकडे तसे संख्याबळ नाही. राज्यात महाविकास आघाडीत ज्याप्रमाणे काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येत आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या जागेमधून काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. भाजपाकडे स्वतःचे संख्याबळ असल्याने आमचा उमेदवार सहज विधान परिषदेवर निवडून जाईल, अशी माहिती पालिकेतील भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

मुंबई महापालिकेतील संख्याबळ

  • शिवसेना - 97
  • भाजपा - 83 (यात 1 अभासे व 1 अपक्ष नगरसेवकांचा समावेश)
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 29
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 8
  • समाजवादी पार्टी- 6
  • मनसे - 1
  • एमआयएम - 2
Last Updated : Jul 14, 2021, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details