मुंबई -मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने प्रभाग पुनर्रचना आपल्या सोयीची केली. यामुळे भाजपच्या ४० ते ५० जागा वाढल्या. या जागांपैकी ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रभागांच्या भौगोलिक पुनर्रचनेत सुधारणा करण्यात यावी. येत्या २०२२ च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी यात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राजकीय वाद -
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहे. या निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीला ९ महिने शिल्लक असताना आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात प्रभाग पुनर्रचनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरु झाला आहे. यात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रभाग पुनर्रचनेवरून थेट राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.