मुंबई -मागील 6 ते 7 वर्षांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकडून देशातील जनतेचे हाल सुरू आहेत. प्रचंड महागाई, पेट्रोल - डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर यांच्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे अक्षरशः मोडले आहे. आजची ही काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली पदयात्रा हा देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे आणि या पदयात्रेच्या माध्यमातून आपण केंद्रातील भाजप सरकार विरोधात ऐतिहासिक युद्ध पुकारले आहे, असे वक्तव्य ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राष्ट्रीय काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आज मुंबईत केले.
काँग्रेसतर्फे मुंबईतील पदयात्रा म्हणजे भाजप सरकारविरोधात पुकारलेले ऐतिहासिक युद्ध - के. सी. वेणूगोपाल - भाजप सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन
काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली पदयात्रा हा देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे आणि या पदयात्रेच्या माध्यमातून आपण केंद्रातील भाजप सरकार विरोधात ऐतिहासिक युद्ध पुकारले आहे, असे वक्तव्य ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राष्ट्रीय काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आज मुंबईत केले.
वाढती बेरोजगारी आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे आज मुंबईतील हिंदू कॉलनी दादर येथील राजगृह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी, शिवाजी पार्क अशी पदयात्रा काढण्यात आली होती त्यावेळेस ते बोलत होते.
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळेस म्हणाले की, आजची पदयात्रा ही देशामध्ये मध्ये वाढत्या महागाई विरोधात, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या दरांच्या विरोधात, महिलांवर व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात काढण्यात आली होती. मनमानी मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात हा जनतेचा आवाज आहे आणि ही पदयात्रा म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला इशारा आहे की, आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे, असेही भाई जगताप म्हणाले.