मुंबई -मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १४ मे ला मुंबईतील बीकेसी मैदानावर ( Cm Uddhav Thackeray Sabha ) जाहीर सभा घेणार आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मागील अडीच वर्षाच्या कालावधीतील ही पहिली खुली मैदानी सभा असल्याकारणाने उद्धव ठाकरे या सभेमध्ये विरोधकांचा कसा समाचार घेतात? त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या या सभेची चर्चा होत असताना दुसरीकडे १ मे रोजी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ( Raj Thackeray Sabha ) सभेसाठी पोलिसांनी परवानगीला नाकीनऊ आणले होते. अखेर १६ अटी शर्ती घालून त्यांना परवानगी देण्यात आली होती. जर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी अटी शर्ती लागू होतात. तर, उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी अटी शर्ती लागू होत नाहीत का?, असा सवाल मनसेने उपस्थित केला ( Mns Question On Cm Uddhav Thackeray Sabha ) आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला १६ अटी शर्ती वर परवानगी? - १ मे औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून राज ठाकरे यांना १६ अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. त्या अटी शर्ती खालीलप्रमाणे.
१. सदर जाहीर सभा दिनांक ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
२. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
४. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
५, ६. सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या माहिती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचेकडे द्यावी.
७. सभा स्थळाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्याठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये.
८. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावं, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलिसांना असेल.
९. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही. अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
१०. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत आवाजाची मर्यादा असावी.
११. सदर कार्यक्रमादरम्यान कोणत्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, रुग्णाहिका, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
१२. सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालयाकडुन काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरिकांना बंधनकारक राहील.
१३. सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.
१४. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.
१५. सदर कार्यक्रमादरम्यान मिटाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिटाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी,
१६. हा कार्यक्रम सुव्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी आपणास घालुन दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल.
या १६ मधील १२ अटींचे उल्लंघन राज ठाकरे यांनी केलं होतं. म्हणून त्यांच्यावर आयपीसी कलम ११६, ११७, १३५, १५३ अ, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक सलोखा बिघडवणे, समाजात ततेढ निर्माण करणे, इतरांच्या भावना दुखावणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे या सर्व बाबींचे उल्लंघन त्यांनी केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही अटी? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जरी ही सभा संबोधित करणार असले असली तरी त्यांनाही अटींचे पालन कराव लागणार आहे. खुल्या मैदानातील सभेसाठी ज्या अटी असतात त्या अटी त्यांनाही लागू करण्यात आलेल्या आहेत. परंतु, त्या सौम्य पद्धतीच्या आहेत. कारण ते शिवसेना पक्षप्रमुख जरी असले तरीसुद्धा मुख्यमंत्री या नात्याने हे संविधानिक पद आहे, याचे भान त्यांना असणार आहे.