मुंबईकाँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सातत्याने अपमान केला आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना जाणीवपूर्वक अपमानित करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानाचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुंबईत दिली आहे. RSS इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना मानधन मिळत होते, असे वक्तव्य भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याचा तीव्र शब्दात फडणवीस यांनी निषेध केला आहे.
राहुल गांधींना इतिहास माहित नाहीस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी दिलेला लढा आणि त्या याची जाणीव राहुल गांधींना नाही. त्यांना मुळातच भारताचा इतिहास माहित नाही. सावरकरांकडून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आहे. सावरकरांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भारतातील जनता होती, असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
राहुल गांधींच्या वक्तव्याचा ठाकरे समर्थन करतात का ?राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना आपले काही सवाल आहेत. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा आपण निषेध करणार की नाही ? भारत जोडो यात्रेच्या स्वागताला शिवसेनेचे नेते पाठवणार आहात का ? राहुल गांधींच्या वक्तव्याचा आपण निषेध करणार की नाही, असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगासमोर शिवसेना आपली उरलीसुरली ताकद दाखवते आहे. वास्तविक बहुतांश आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे यांच्यासोबत असल्याने तीच खरी शिवसेना आहे. याची जाणीव झाल्याने ठाकरे निवडणूक आयोगापुढे केविलवाना प्रयत्न करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
संजय पांडे यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांना अडकवलेमुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना तत्कालीन सरकारने हाताशी धरून अनेक अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात कुभांड रचले गेले. त्यांच्या विरोधात एकतर्फी अहवाल तयार केले गेले. मात्र आम्ही कोणाचाही बळी जाऊ देणार नाही. आणि कोणाचा बळी घेणारही नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.