मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी काही तास उरले असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार एकमेकांविषयी उपप्रचार करताना दिसत आहे. ईशान्य मुंबईतील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फोटो एडीट करून समाजमाध्यमावर प्रसारित केला, अशी तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फोटो व्हायरल करून अपप्रचार; तक्रार दाखल - loksabha2019
भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फोटो एडीट करून समाजमाध्यमावर प्रसारित केला, अशी तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा निवडणूक प्रचार शनिवारी सांयकाळी संपला. त्यामुळे उमेदवार समाज माध्यमांवर आपला प्रचार गुप्तपणे करत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांचा फोटो एडीट करून प्रसारित केला, अशी तक्रार आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांनी केली आहे.
हा प्रकार मनोज कोटक यांनीच केला आहे, असा आरोप ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केला. समाजातील आणि बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुलुंड पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. यावेळी मनोज कोटक यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जो कोणी हा फोटो एडिटिंग करून प्रसारित केला त्यावर पोलीस प्रशासनाने लवकर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सुमेध कुशलवर्धन मुंबई समन्वयक वंचित आघाडी, ईश्वर शिंदे भांडुप, विकास पवार सरचिटणीस मुंबई, आनंद जाधव मुंबई अध्यक्ष उपस्थित होते.