मुंबई - उपनगर अंधेरी येथील चिनाय आणि एमव्हीएलयू कॉलेजवर प्रशासक नेमण्याच्या मागणीवरून वाद विकोपाला गेल्याने मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे दाद मागितली आहे.
शर्मा यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले
अंधेरी येथील चिनाय आणि एमव्हीएलयू कॉलेज बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले असून कॉलेज बंद करू नयेत असे आदेश सर्वोच्च न्यायालय दिले आहेत. मात्र, त्यानंतरही कॉलेज प्रशासन कॉलेज बंद करण्यावर ठाम असल्याने या प्रकरणी माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, या प्रश्नाकडे राज्य सरकार कानाडोळा करत असल्याचा आरोप करत शर्मा यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले आहे.