मुंबई :महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप व शिवसेनेत रणधुमाळी रंगली असताना दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्यासुद्धा सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात ५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप व महविकास आघाडी या दोघांनी सहावा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. परंतु, या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे एक-एक मत महत्त्वाचं असताना राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
निवडणूक चुरशीची होणार : विशेष करून मुंबईत ही बाब चिंताजनक असून बहुतेक सर्वच पक्षांच्या आमदारांचा मुक्काम आता मुंबईतच असल्याने टेंन्शन अजून वाढले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः कोरोना बाधित झाले आहेत. त्या कारणाने ते कशा पद्धतीने मतदान करणारा हेसुद्धा पहावे लागणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ही बरीच खालावली आहे. ४० दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे तशा पद्धतीची विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून, धनंजय मुंडे यांनाही ताप आला असल्याचे समजत आहे. अशा परिस्थितीमध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडताना इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.