मुंबई -कोरोना महामारीत जीवनावश्यक असलेल्या डाळी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अतिवृष्टीचा उत्पादनावर परिणाम व वाढती मागणी यामुळे डाळीचे दर वाढत आहेत. कडधान्याची आयात बंद असल्याने दालमिल चालकांनाही जादा दराने कच्चा माल खरेदी करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना महामारीत ऑक्टोबरमध्ये डाळीचे भाव वाढले आहेत. टाळेबंदीपूर्वी तूर डाळीची किंमत प्रति किलो 85 ते 90 रुपये होती. सप्टेंबरमध्ये साधारणत: हीच किंमत होती. पण, गेल्या 15 दिवसांत तूर डाळ सुमारे 30 रुपये प्रति किलोने वाढली आहे. सध्या, बाजारात तूर डाळीचा प्रति किलो दर 130 ते 135 रुपये आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, तूर खरेदी 9 हजार 500 रुपये प्रति क्विटंल दराने होत आहे. हीच तूर डाळ बाजारात विक्रीला आल्यावर मोठी भाववाढ होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जाणार आहे.
या कारणाने डाळीच्या मागणीत वाढ
- टाळेबंदी खुली झाल्यानंतर राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट 5 ऑक्टोबरपासून खुली झाली आहेत. त्यामुळे डाळीची मागणी वाढत आहे.
- आगामी नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या निमित्ताने तसेच लग्नसराईमुळे डाळींच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.
- मागणीच्या तुलनेत बाजारात डाळीची आवक कमी आहे.
- डाळीची साठेबाजी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
- कोरोनाच्या संकटात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी प्रथिनेयुक्त आहारावर भर देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच कोरोनाच्या संकटात भाजीमंडईत सतत खरेदीला जाण्यापेक्षा डाळयुक्त आहारावर अनेक नागरिकांनी भर दिला आहे. या कारणाने डाळीच्या मागणीत नेहमीपेक्षा वाढ होत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे.
साठेबाजीवर नियंत्रण हवे-
डाळीचा तुटवडा असताना शिल्लक साठा असताना दुकानदार दर पाहून विक्री करत आहेत. डाळीचे भाव आणखी वाढतील, असा दुकानदारांचा अंदाज आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असताना व्यापारी वर्गाकडून साठेबाजी होण्याची शक्यता आहे. सरकारने साठेबाजीवर नियंत्रण ठेवल्यास काहीप्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
जळगाव
अतिवृष्टीमुळे कडधान्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. विविध डाळींच्या भावात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अजून नवीन तुरीची आवक झालेली नाही. पण जुनी तूर सुमारे नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात विविध पिकांचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येणारा उडीद व मुगही पुरेशा प्रमाणात बाजारात आलेला नाही. आवक झालेली डाळही कमी दर्जाची आहे.
साठेबाजीचाही परिणाम-
गेल्या वर्षभरापासून विदेशातून होणारी कडधान्याची आयात बंद असल्याने मालाची अधिकच कमतरता भासत आहे. त्यामुळे कडधान्याची आवकच नसल्याने दालमिल चालकांनाही कच्च्या मालाची अधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. परिणाम डाळींची भाववाढ झाल्याचे जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी दिली. देशात जवळपास 30 ते 40 टक्के तूर डाळ ही विदेशातून आयात होते. तूरडाळीला वर्षभर मागणी असते. म्हणून भाव मोठ्या प्रमाणावर वाढतात, असे दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
अशी आहे राज्यांत डाळीच्या भाववाढीची स्थिती
हिंगोलीत सप्टेंबरमध्ये तूर डाळीचा दर प्रति किलो 80 ते 85 रुपये होता. मागील आठवड्यात डाळीचा दर ९० रुपये किलो होता. या दरात आणखी वाढ होऊन सध्या डाळीचा दर प्रति किलो 110 ते 120 रुपये आहे. तर पुण्यात मार्केट यार्डमध्ये तूर डाळ प्रति किलो 100 रुपये आहे.
गोंदिया
एक दिवसापूर्वी (बुधवारी) तूर डाळीचा भाव १०० रुपये प्रति किलो होता. आज (गुरुवारी) डाळीचा भाव 130 रुपये प्रति किलो आहे.
औरंगाबादमध्ये डाळींचे भाव
डाळीचा प्रकार आजचे दर जुने दर
1) तूर 120 95
2) चणाडाळ 80 66
3) मुगडाळ 110 95
4) मसुरडाळ 80 75
बीडमध्ये डाळींचे भाव
डाळीचा प्रकार आजचे दर जुने दर
1) तूर 110 90