मुंबई -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. पावसाचे पाणी साचू नये म्हणून नालेसफाईचे काम महत्वाचे आहे. या कामाला सहकार्य न केल्याने डिजास्टर ऍक्टनुसार कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच १५ मे पूर्वी गाळ काढण्याच्या तसेच अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. आज (गुरुवारी) पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) नालेसफाईच्या कामाची पाहणी ( Mumbai Nalasfai Inspection tour ) करत असताना उत्तर भारतीय संघ भवनासमोरील मिठी नदीतील उपसा ( Mithi river ) केलेला गाळ ठेवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिल्याचे समोर आले. नालेसफाई दरम्यान काढण्यात आलेला गाळ सुकवण्यास जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी डिजास्टर ऍक्टनुसार मुंबई विद्यापीठाला नोटीस ( Notice of BMC to Mumbai University ) द्या, असे आदेश आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
'१५ मेपर्यंत सर्व गाळ काढा' :नालेसफाईच्या कामाला १५ दिवस उशीर झाला असला तरी या कामाला आता वेग आला आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून ८ तास ऐवजी १६ तास म्हणजे दोन शिफ्टमध्ये करण्याचे, मशिनरी वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटदारांना तीन टप्प्यात काम दिले आहे. जो कंत्राटदार मे महिन्याच्या सुरुवातीला ५० टक्के गाळ काढणार नाही, त्याला पुढील दोन टप्प्याचे काम दिले जाणार नाही. ते काम इतर कंत्रादाराकडून करून घेतले जाईल, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहे.