मुंबई - भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे.
प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत - स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती देखील केली जात आहे. या संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच अंमलबजावणीच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चित्रीकरण करा, देखरेख पथक -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज खरेदी करून घरोघरी पोहोचवण्याचे मोठे लक्ष्य महानगरपालिकेने समोर ठेवले आहे. राष्ट्रध्वज खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सर्व २४ विभाग कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निश्चित घरांच्या संख्येनुसार राष्ट्रध्वज तिरंगा पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जात आहे. सर्व विभाग कार्यालयांनी राष्ट्रध्वज साठा प्राप्त झाल्यानंतर दररोज त्याचे योग्य रीतीने आणि जलद कार्यवाही होईल, अशा रीतीने वितरण करावे.