मुंबई - आज गुरु पौर्णिमा. राजकीय दृष्ट्या शिवसेनेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी गुरु पौर्णिमेला अनेक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत असतात. ( Eknath Shinde On Balasaheb Thackery ) मात्र, पहिल्यांदाच शिवसेनेत एवढी मोठी फूट पडल्याने जवळपास अर्धा पक्ष रिकामा झालेला आहे. अशी परिस्थिती असताना बंडखोर गटाकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात आहे. आज बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना अभिवादन केले व माध्यमांशी संवाद साधला.
बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच -यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या स्मृतीस्थळावर येत असतो. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच एक साधा कार्यकर्ता शिवसैनिक आज मुख्यमंत्री म्हणून काम करतोय. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला ही संधी मिळाली. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि त्यांचा विचार पुढे नेण्याचा मी आणि माझ्यासोबतचे सर्व 50 आमदार पूर्ण प्रयत्न करू. बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी हिंदू माणसाला आणि त्यांच्या हिंदुत्वाला ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही बाळासाहेबांचे हे विचार महाराष्ट्रात पुढे नेतोय."
बाळासाहेब आमच्या पाठीशी -पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने बनलेले सरकार आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करेल. शेतकरी, कष्टकरी, वारकरी या सर्वांचा सर्वांगीण विकास आमचे सरकार करेल. या राज्याचा उत्कर्ष आणि प्रत्येक माणसाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आज आम्ही सर्वांनी बाळासाहेबांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. मला खात्री आहे बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत."