महाराष्ट्र

maharashtra

Student Disaster Friend : आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी 'असे' वाचविणार मुंबईकरांचे प्राण

By

Published : Oct 18, 2022, 11:26 AM IST

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ( Department of Emergency Management ) नागरिकांच्या सोबत आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे प्रशिक्षण दिलेले विद्यार्थी ( Trained students ) संबंधित आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणी पोहचून मुंबईकरांचा जीव वाचवणार आहेत.

Student Disaster Friend
महाविद्यालयीन विद्यार्थी वाचवणार मुंबईकरांचा जीव

मुंबई : मुंबईमध्ये आगी लागणे, इमारती घरे कोसळणे अशा घटना घडतात. अशा घटना घडल्यावर मोठया प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते. ही हानी रोखण्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ( Department of Emergency Management ) नागरिकांच्यासोबत आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे प्रशिक्षण दिलेले विद्यार्थी ( Trained students ) संबंधित आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणी पोहचून मुंबईकरांचा जीव वाचवणार आहेत.

पालिकेकडून नागरिकांना प्रशिक्षण :मुंबईमध्ये दाराशी कोसळून शकतात अशी ७२ ठिकाणे आहेत. रोजच टोलेजंग इमारतीत आगी लागण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात इमारती आणि घरे कोसळण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडल्यावर स्थानिक नागरिकांकडून सर्वात आधी मदत पोहचवली जाते. यासाठी स्थानिक नागरिकांना मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. आपत्ती व्‍यवस्‍थापन विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण देणा-या १२३ कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून त्‍यात ८५०० पेक्षा जास्‍त नागरिकांना प्रशिक्षित करण्‍यात आले आहे. आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागामार्फत मुंबई परिसरातील, महाराष्‍ट्र राज्‍यातील शासकीय, निम-शासकीय, अशासकीय, शाळा, महाविद्यालये, खासगी संस्‍थांच्‍या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक-विद्यार्थी यांच्‍याकरिता आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विषयक कार्यक्रम आयोजीत केले जातात.


विद्यार्थी आपदा मित्र :आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापना सोबत प्रथमोपचार, सीपीआर यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ५ दिवसांचे हे प्रशिक्षण असून हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आपदा मित्र म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. एखादी घटना घडल्यास महाविद्यालयीन विद्यार्थी कधीही उपलब्ध होतात. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्‍ट्र शासनामार्फत देण्‍यात आलेल्‍या आपत्‍कालीन परिस्थितीत वापरावयाचे कीट, प्रमाणपत्र तसेच आपदा मित्र ओळखपत्र दिले जाणार आहे. किटमध्ये लाईफ जॅकेट, हेल्मेट, प्रथमोपचार साहित्य यासारख्या विविध बहुपयोगी वस्तुंचा समावेश असणार आहे. प्रशिक्षण प्राप्‍त प्रशिक्षणार्थींची नावे ते रहात असलेल्‍या इमारतींमध्‍ये दर्शनी भागांवर प्रदर्शित करण्‍यात येणार आहेत. जेणेकरुन प्रथमोपचार, सीपीआर करिता या प्रशिक्षित मनुष्‍यबळाची मदत त्‍वरित प्राप्‍त होऊ शकेल. अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी या निमित्ताने दिली.


असे बना आपदा मित्र :नागरिकांना आपदा मित्रचे प्रशिक्षण घ्‍यावयाचे असल्‍यास त्‍यांना आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागामार्फत dm.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर एक वेब फॉर्म उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षण प्राप्‍त करण्‍याकरिता इयत्ता ७ वी उत्तीर्ण, वयोगट १८ ते ४०, चांगले शारिरीक व मानसिक आरोग्‍य अशा प्राथमिक अटी असून एनएसएस, एनसीसी, होमगार्ड, नागरी संरक्षण दल यामध्‍ये काम केल्‍याचा अनुभव असणा-यांकरिता प्राधान्य असणार आहे. महाराष्‍ट्र शासनामार्फत सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगरांकरिता प्रत्‍येकी ५०० ‘आपदा मित्र’ तयार करण्‍यात येणार आहेत.


आपत्तींची जोखीम कमी करण्यास मदत :जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये रोज आपत्तीच्या घटना घडतात. यासाठी पालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत व अशा परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम जागतिक आपत्ती जोखीम घट दिनाच्या निमित्ताने सुरु केला आहे. हे प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थींनी आपल्या महाविद्यालयात व सोसायटीत जाऊन तेथील किमान १० व्यक्तिंना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक व्यापक स्तरावर साध्य करण्यासोबतच संभाव्य आपत्तींची जोखीम कमी करण्यास मदत होणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details