मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या ५० टक्के पूर्ण झाले ( Coastal Road work 50 percent complete ) असून, २०२३ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होईल, असे ग्वाही मनपा आयुक्त इक्बाल चहल ( Municipal Commissioner Iqbalsingh Chahal ) यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडचा आढावा ( CM Thackeray Reviews Coastal Road Work ) घेतला. दरम्यान, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
अधिकाऱ्यांची घेतली बैठक : आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल (दूरदृष्यप्रणाली द्वारे) यांच्यासह इतर मंत्रालयीन अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना : मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्षातून आढावा घेण्यात येत असलेल्या योजनांची तसेच कामांची माहिती यावेळी घेतली. यावर्षी शासनाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जाहीर केली आहे. यातील महत्वाच्या विषयांचा, कामांचा पाठपुरावाही संकल्प कक्षामार्फत घेतला जावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.