मुंबई - देशात अभूतपूर्व कोळशाचा तुटवडा जाणवतोय. कोळशाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात वीज निर्मितीची समस्या निर्माण झाली असून राज्य अंधारात जाईल का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरातील काही राज्यांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती जाणवते. देशात कोळसा तुटवडा निर्माण झालाय त्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचा थेट हल्ला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
खाण्याचे वितरण झाले, पण खाणी सुरू झाल्या नाहीत -
देशात कोळसा मिळत नाहीय. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. आयात कोळसा करुनही तो उपलब्ध होत नाहीय. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन आहे. ते जास्त खर्च होतेय असेही नवाब मलिक म्हणाले.
'..या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार'
युपीए सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे. याची निर्मिती झाली पाहिजे त्याची पॉलिसी निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या त्यावेळी भाजपाने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या. त्या आजपर्यंत त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच खाणीत कोळसा असताना खणीकरण होत नाही. कोळसा परदेशातून आयात होतो. या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा -आताही मीच मुख्यमंत्री असल्याचे फडणवीसांचे स्वप्न हास्यास्पद - अतुल लोंढे