मुंबई - महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात तब्बल चार रुपयांची दरवाढ करण्याची घोषणा ( Mumbai CNG Gas Price Hike ) केली आहे. त्यामुळे सीएनजी दर 72 रुपयांवरून 76 रुपयांवर पोहोचले आहे. यावेळी पीएनजी दरात मात्र कोणताही बदल केला नसल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, सीएनजी दरवाढीची सर्वाधिक झळ रिक्षा व टॅक्सी चालकांना बसत आहे. त्यामुळे अनुदानित दराने सीएनजी पुरावावा, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने केली ( Riksha Driver Warn On Strike ) आहे.
महानगर गॅसने एप्रिल महिन्यात सलग तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करत गॅस 30 टक्क्यांनी महाग केलेले आहे. या दरवाढीनंतर 72 रुपये प्रतिकिलो असलेला सीएनजी आता 78 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहे. अनेक खाजगी वाहन चालकांनी या दरवाढीनंतर वाहने जागीच उभी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याउलट रिक्षा व टॅक्सी चालकांना सीएनजीशिवाय पर्याय नसून मर्यादित भाड्यामध्ये प्रवासी वाहतूक करावी लागत आहे.