औरंगाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. पाणी पुरवठा योजने अंतर्गत दिल्ली गेट येथे बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या कामाची ते पाहणी करणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा बैठक होणार आहे. या आधीही ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात औरंगाबादचा दौरा केला होता.
असा आहे कार्यक्रम
शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर येतील. तेथून ते हेलिकॉप्टरने बुलढाणा जिल्ह्यात लोणारकडे प्रयाण करतील. जगप्रसिद्ध लोणार सरोवराची ते पहाणी करणार आहेत. तसेच ते तेथिल विकास कामाचाही आढावा घेतली. त्यानंतर ते औरंगाबादला परततील. दुपारी १२. ०५ मिनीटांनी ते औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दिल्लीगेट जलकुंभ कामाची पाहाणी करणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, अब्दुल सत्तार उपस्थित असतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
लोणार सरोवराची करणार पाहणी
जिल्ह्यातील जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज (शुक्रवारी 5 जानेवारीला) बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते लोणार येथे येत आहे. दौऱ्या दरम्यान ते लोणार सरोवर ची पाहणी करणार आहेत. लोणार सरोवराचा सर्वांगीण विकास होऊन या ठिकाणी देशी व विदेशी पर्यटकाची मंदीयाळी वाढवी या दृ्ष्टीने हा दौरा केला जात आहे. मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांच्या लोणार दौऱ्या हा अचानक जाहीर झाल्याने सर्व विभागाची धावपळ सुरू झाली आहे. लोणार सरोवरा संदर्भात मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसरा औरंगाबाद दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर जात आहेत. या आधी त्यांनी डिसेंबर महिन्यात औरंगाबादचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ केला होता.
हेही वाचा - इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आज राज्यव्यापी आंदोलन, बैलगाडी तसेच सायकल मार्च काढणार
हेही वाचा - शेतकऱ्यांनी दुसरा मार्ग अवलंबला तर देशासमोर मोठे संकट - शरद पवार