महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाची लाट नव्हे सुनामी येणार, लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण नागरिकांना काळजी घ्यावी. कारण जर कोरोना उपचारासाठी रुग्णालये कमी पडू लागली तर जीव वाचवणे अवघड होईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Nov 22, 2020, 9:44 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीसह अनेक राज्यात रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येणार नसून ती सुनामी येणार आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावायचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधन करताना

जेष्ठ नागरिक, आजारी लोकांना कोरोनापासून वाचवा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना जगभरात आणि देशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याकडे रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र ती वाढू नये, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आता लाट नव्हे सुनामी येणार आहे. गर्दीमुळे कोरोना वाढणार आहे. जेष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना कोरोना घातक आहे. आताच्या लाटेत त्यांना वाचवणे गरजेचे आहे. तरुण नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून जेष्ठ नागरिक आणि आजारी लोकांना कोरोनाची लागण देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाचे दुष्परिणाम किडनी, डोक्यावर, फुफुस्सावर होत आहेत. मग या कोरोनाची का परीक्षा घ्यायची असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

मंदिरात गर्दी करू नका -


उत्सव हे उत्सवासारखे साजरे केले पाहिजेत. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा हे सण साधेपणाने साजरे केले. शिवसेनेने दसरा मेळावाही साधेपणाने साजरा केला. मी तुम्हाला सांगितले त्याचे स्वत:ही पालन केले आहे. दिवाळीत फटाके फोडू नका, अशी दक्षता घ्यायला सांगितलं, तुम्ही ते नियम पाळले. छटपूजा गर्दी न करता पार पाडली. मागणी केल्या प्रमाणे मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली आहेत. मात्र त्या ठिकाणी गर्दी करू नका. कार्तिकी येतेय त्यावेळीही गर्दी करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

लॉकडाऊनच्या दिशेने जायचे का ?

देशभरातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याठिकाणी रात्रीचा कर्फ्यु लावण्यात आला आहे. असाच रात्रीचा कर्फ्यू लावण्याची मागणी माझ्याकडेही केली जात आहे. मात्र मी कोणावरही सक्ती करणार नाही. अजूनही वेळ गेली नाही आणि पुन्हा ही वेळ येणार नाही. अशा वळणार आपण आहोत. तुम्ही विचार करा, पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला विचारला आहे. गर्दी टाळा, अनावश्यक घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, हात वेळोवेळी स्वच्छ धुवा या नियमांचे पालन करा. आजपर्यंत जे सहकार्य दिलेत तेच सहकार्य यापूढेही द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

24 ते 25 कोटी लसीची गरज -


राज्यात अनेक जण मास्क लावत आहेत. मात्र गर्दीत जात आहेत. गर्दीमुळे कोरोना वाढतो. अँटीबॉडीज असल्या तरीही कोरोना होतो याबाबत संशोधन सुरू आहे. अद्यापही कोरोनावर लस आलेली नाही. राज्यात 12 कोटी नागरिक आहेत. या नागरिकांना दोनदा लस द्यावी लागणार आहे. एकदा लस आणि दुसऱ्यांदा बूस्टर डोस द्यावा लागणार आहे. यासाठी 24 ते 25 कोटी लसीची गरज लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क लावा, गर्दीत अनावश्यक जाण्याचे टाळा, हात स्वच्छ धुवा, काही लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्या, या नियमांचे पालन करा असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती करा -

कालच संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन करायला गेलो होतो. त्यांनी संघर्ष केला नसता तर मुंबई आपल्याला महाराष्ट्राला मिळाली नसती. चार दिवसांनी 26 / 11 च्या हल्ल्याचा दिवस येत आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना आपल्या जवानांनी ठेचून मारले. त्याच प्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती करत कोरोनावर विजय मिळवावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ही जबाबदारी तुमची नाही का ? -


कोरोना दरम्यान लॉकडाऊन लागला. सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना माझ्याकडे हे उघडा ते उघडा याची मागणी केली जातेय. मागणीप्रमाणे मी मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडी केली. मग त्या ठिकाणी गर्दी कमी करण्याची जबाबदारी तुमची नाही का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details