मुंबई -कश्मिरी पंडितांच्या ( Kashmiri Pandit ) मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे, ते सर्व करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Support Kashmiri Pandit ) यांनी दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे -गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकेच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.