मुंबई : राज्यपालांचे अभिभाषण याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रत्येक मुद्द्याला प्रत्युत्तर दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपने केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. "शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं नाही. बाबरी मशीद पाडली तेव्हा, येडे गबाळे पळून गेले मात्र बाळासाहेब उभे राहिले" अशी जळजळीत टीका त्यांनी विरोधकांवर केली. यासोबतच काश्मीरमध्ये पीडीपी सोबत मांडीला मांडी लावून सत्ता भोगली त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सावरकर, राम मंदिर मुद्द्यांवरुनही भाजपाला टोले..
सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी दोन वेळा पत्रं लिहिण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने अद्यापही त्या पत्रांची दखल घेतली नाही, याची आठवणदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी करुन दिली. तसेच, राम मंदिर बांधण्यासाठी आता घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली जातेय. राम मंदिर बांधल्यानंतर तिथे तुमची नावं लागली पाहिजेत, यासाठी ही सगळी खटाटोप असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
शर्जील उस्मानीवर कारवाई होणारच..
शर्जील उस्मानी यांनी केलेल्या वक्तव्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणारच असे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले. मात्र, हा शर्जील उस्मानी उत्तर प्रदेश मधील घाण आहे. ती तिथेच संपवता येत नाही, अशी खरमरीत टीकादेखील उद्धव ठाकरे यांनी केली.
बंद दाराआडील चर्चा पुन्हा पुढे..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला. बंद दाराआड झालेल्या चर्चा आम्ही निर्लज्जासारख्या जाहीर करत नाही, असा टोमणा त्यांनी यावेळेस लगावला. बाळासाहेब राहत असलेली ती खोली फक्त खोली नसून, आमच्यासाठी मंदिर आहे हे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
शिवभोजन थाळीने गरिबांची पोटं भरली..
महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे गरिबांची पोटे भरली. महाविकास आघाडी सरकारने गरिबाला भरलेली थाळी दिली; केंद्र सरकारप्रमाणे रिकामी थाळी वाजवायला लावली नाही. अशी कोपरखळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विरोधकांना काढली.
कोविड काळात झालेला भ्रष्टाचाराचा आरोप..
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा मुद्दा आपल्या भाषणातून काढला होता. मात्र राज्याने कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे कोविड काळात काम केलं हे आपल्या भाषणातील सांगण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. कोणतेही आरोप करताना महाराष्ट्राची बदनामी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असा चिमटादेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना काढला. सुरुवातीच्या काळात सुविधा अपुऱ्या असताना देखील उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. जिल्ह्यात सगळीकडे कोविड सेंटर सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आली. तर सुरुवातीला कोविड चाचणी करण्यासाठी राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या, आता ती संख्या 500च्या वर गेली आहे हे देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.
कोविड काळात राज्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्या नंतर "मी जबाबदार" अशी देखील मोहीम राबवली आहे. हे उघडा,ते उघडा असं बोलणाऱ्यांसाठी ही खास मोहीम आहे. "राज्याच्या जनतेसाठी माझ्यावर चिखलफेक झाली तरी चालेल, मात्र मी जनतेसाठी काम करीत राहील" असं त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
केंद्र सरकार शेतकरी विरोधी..
पंजाबचा शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करतोय. मात्र केंद्र सरकारकडून त्यांना सहकार्य दिलं जात नाही. उलट त्यांची वीज कापण्यात येते, त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो, शौचालयाची व्यवस्था काढण्यात येते, शेतकऱ्यांची अशी गैरसोय केंद्र सरकारकडून केली जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. विजेच्या प्रश्नावर देखील लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.
मेट्रो कार शेडचा मुद्दा..
महाराष्ट्र मेट्रो कार शेडचा मुद्दा हा प्रतिष्ठेचा होऊ शकत नाही. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र बसून यामधून मार्ग काढणं गरजेचं आहे. सर्व मेट्रो लाइन्सच्या कारशेड एकच झाल्याने भविष्यात त्याचा मोठा फायदा आपल्याला होणार असून, त्यामुळे मेट्रो कारशेड हे कांजूरमार्ग येथे व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतेय. कांजूरमार्गच्या जमिनी संदर्भात, ही जमीन केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा खाजगी मालमत्ता आहे या यासंदर्भात न्यायालयात निकाल येईलच. मात्र मेट्रो कारशेड तिथे व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे; अशी भूमिका त्यांनी आपल्या भाषणातून मांडली.