मुंबई:आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत मोठी सभा घेणार ( CM Uddhav Thackeray Rally ) आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत ( Shivsena Shivsampark Abhiyan ) ही सभा बीकेसीच्या मैदानावर ( BKC Ground Mumbai ) होणार आहे. या सभेमध्ये अनेकांचा मास्क काढणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. या सभेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे.
३ टिझर लाँच :या सभेसाठी शिवसेनेकडून ३ टिझर सुद्धा लाँच करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक पोस्टरही जारी करण्यात आलं आहे. "हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व" असल्याचं शिवसेनेने त्या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला आहे. यामध्ये, 'मी शिवसेना प्रमुख जरूर आहे पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे' असं टीझर मध्ये बघायला भेटतं. त्याचबरोबर साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आव्हानही शिवसेनेने टिझरमधून केलं आहे. तर लाँच झालेल्या तिसऱ्या टिझरमध्ये, "तुम्ही मला फक्त वज्र मूठ द्या! दात पाडायचं का मी करून दाखवतो! हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला, शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्यायला, यायलाच पाहिजे असं शिवसेनेच्या तिसऱ्या टीझर मध्ये म्हटलं आहे.
विरोधकांचा घेणार समाचार :सध्या राज्यात अनेक विषय चर्चिले जात असून त्यामध्ये हिंदुत्व, विशेष करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छेडलेला भोंगा हा विषय राष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. त्यासोबतच या विषयावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेलं खरमरीत पत्र. या मुद्द्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या सभेत उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रथम क्रमांकावर असतील. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप नेते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या क्रमांकावर असतील. मुंबई महानगरपालिका सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने हाती घेतलेली पोल-खोल मोहीम व व सातत्याने पालिकेवर भ्रष्टाचाराचे केले जाणारे आरोप या कारणास्तव उद्धव ठाकरे या आरोपांवरून देवेंद्र फडवणीस यांना निशाण्यावर धरतील. तर हनुमान चालीसा पठण वरून निर्माण केलेला खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचा वाद. तसेच १४ मे, ला होणाऱ्या सभेत," तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ते स्पष्ट करा," असं खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आव्हान, तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा या सर्व गोष्टींवर भाष्य करताना मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपदाचा मुखवटा काढून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कशा पद्धतीने विरोधकांचा समाचार घेतात याकडे सर्वांचच लक्ष लागलेल आहे.
दोन वर्षानंतर पहिलीच जाहीर सभा : दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठलीही जाहीर सभा घेतली नव्हती. मध्यंतरी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतरची त्यांची ही पहिलीच सभा असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : CM's challenge : मुख्यमंत्र्यांचे आव्हान; 14 तारखेला घेणार विरोधकांचा समाचार