मुंबई -विधान परिषदेची निवडणूक 20 जूनला पार पडल्यानंतर सायंकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपले समर्थक आमदारांसोबत आधी रस्ते मार्गाने सुरतला पोहोचले. त्यानंतर 21 जूनच्या रात्री विमानाने त्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटी गाठली. 21 जूनलाच सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक तसेच महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी संवाद साधताना झालेल्या प्रकरणानंतर आपण हताश झाल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते.
शरद पवारांनी थांबवले - मात्र मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून साधलेल्या संवादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल पटेल हे त्यांच्या भेटीला आले. त्यांनीच मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून थांबवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्या दिवसानंतर ही मुख्यमंत्री आदल्या दिवशी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते. मात्र तेव्हाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
...म्हणून सोडले मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान -एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पुकारलेला आतापर्यंतच्या मोठ्या बंडाला पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षासाठी चिंतेत होते. आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही. हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या संभाषणातून सांगितले. हे दाखवून देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.