महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ओबीसी आरक्षणाला तसूभर ही धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

ओबीसींच्या हक्कासाठी सरकार तुमच्यासोबत आहे. कोरोनाचे संकट खूप मोठे आहे. शाळा सुरू करायच्या पण त्या कशा सुरू करायच्या यावर चर्चा सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाबरोबर जिथे शाळा सुरू करणे शक्य आहे तिथे शाळा सुरू करता येतील का, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे का, तिथे ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांना टॅब द्यायचे का, याचा आढावा घेणे सुरू आहे.

prakash shendge
ओबीसी आरक्षणाला तसूभर ही धक्का लागणार नाही

By

Published : Jul 22, 2020, 6:40 AM IST

Updated : Jul 22, 2020, 7:20 AM IST

मुंबई - मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका-कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी ॲडव्होकेट जनरल (महाधिवक्ता) यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ओबीसी आरक्षणाला तसूभर ही धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही


ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यावेळी ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की ओबीसींच्या हक्कासाठी सरकार तुमच्यासोबत आहे. कोरोनाचे संकट खूप मोठे आहे. शाळा सुरू करायच्या पण त्या कशा सुरू करायच्या यावर चर्चा सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाबरोबर जिथे शाळा सुरू करणे शक्य आहे तिथे शाळा सुरू करता येतील का, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे का, तिथे ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांना टॅब द्यायचे का, याचा आढावा घेणे सुरू आहे. दूरदर्शन, आकाशवाणीसारख्या माध्यमातून शाळा सुरू म्हणण्यापेक्षा शिक्षण सुरू करता येतील का याचाही प्रयत्न आहे, चॅनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी मी बोललो आहे.


ओबीसींचे कोणतेच प्रश्न दुर्लक्षित राहणार नाहीत. बारा बलुतेदार समाजाच्या प्रश्नांकडेही लक्ष आहे. नाभिक, मच्छिमार समाजाचे प्रश्न माहीत आहेत. कोरोनाचे संकट हे जगावर आलेले संकट आहे. कोणत्या एका समाजावरचे ते संकट नाही. आज सर्वच समाज संकटात आहेत, या संकटाची व्याप्तीही मोठी आहे त्यामुळे जपून पावले टाकावी लागत आहे.
ओबीसींच्या प्रश्नांची दखल मी यापूर्वीही घेतली आहे. आपण मिळून कामही सुरू केले होते. अर्थसंकल्पातून चांगली स्वप्ने राज्यासाठी घेऊन आलो असताना कोरोनाचे संकट आले आहे. पण असे असले तरी ओबीसी समाजाचा एकही प्रश्न किंवा मुद्दा सोडून देणार नाही. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. विचारपूर्वक, कायमस्वरूपी ठोस निर्णय घेण्याचे मी वचन देतो. ओबीसी समाजाला न्याय देणारच. ठामपणे एकेक पाऊल पुढे टाकत जात आहोत. सरकारवर, माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, की ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. ओबीसी समाजावरही मराठा समाजाच्या आरक्षणामुळे कुठलाही अन्याय होणार नाही. ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतुद करुन जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मंत्रीमंडळातील सर्व सहकारी ओबीसींच्या मागणीसाठी सकारात्मक आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, की ओबीसीच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. ज्या जिल्ह्यात ओबीसी आरक्षण कमी आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. महाज्योतीचे कार्यालय नागपूर येथे केलेले असून सध्या महाज्योतीसाठी 50 कोटीची मागणी केलेली आहे. ओबीसी शिष्यवृत्तीसाठीचे एक हजार कोटी पैकी पाचशे कोटी मिळणार आहे. बिंदुनामावली व पदोन्नतीबाबतचेही प्रश्न सोडवण्यात येतील. बारा बलुतेदारांसाठी विशेष आर्थिक तरतुद करण्यासाठीही प्रयत्न केला जाईल.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सींगमध्ये सहभागी झाले.

Last Updated : Jul 22, 2020, 7:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details