मुंबई - मराठी भाषा ही अमृताच्या गोडीप्रमाणे आहे, या आपल्या मराठी भाषेच्या अमृताची गोडी कोणाला लागली तर ती सुटणार नाही, यामुळे आता शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याच्या विधेयकामुळे आपल्या या भाषेचे सामर्थ्य दाखवण्याचे काम यातून होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(बुधवार) विधानपरिषदेत व्यक्त केला. राज्यातल्या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा महत्वाचे विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त् केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी महिला या जात्यावर गाणी म्हणायच्या. आता जातं गेल्याने त्यावरच्या ओव्या गेल्या आहेत. जातं गेल्याने आता रेडीमेट पीठ आले आणि विद्यापीठही आले. आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला साठ वर्ष झाली या काळात आपण हे जे काही मिळवलेले आहे, ते करंटेपणाने गमावू नये, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. आपण आपल्या राज्यात आपली मातृभाषा कोणावर लादणार नाही. कर्नाटकात आपले लोक वर्षानुवर्षे मराठी बोलतात. राज्यातील इतर लोकांवर सक्ती नको, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विधानपरिषदेत मराठी भाषा विधेयकाला विरोधकांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यातून आपण मराठी भाषेची ताकद जगाला दाखवून देवू आणि चांगल्या कामासाठी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अशा प्रकारचे विधेयक हे माझ्या साक्षीने होत असून माझ्या आयुष्यातील हे भाग्य आहे. शिवसेना ही मराठी अस्मिता आणि मराठी भूमिपूत्रांसाठी आहे. त्यांच्या माझ्या काळात हे मंजूर होते, त्यामुळे यापेक्षा मोठे भाग्य दुसरे कोणते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त् केली. मराठी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचं कसे हे मराठी भाषेने शिकवले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते, हिच मराठीची शक्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न