मुंबई - ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' ठरेल. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी ई पीक पाहणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विकास रस्तोगी, निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, प्रकल्प सल्लागार नरेंद्र कवडे, संभाजी कडू- पाटील, तंत्रज्ञ प्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह टाटा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -शेतकऱ्यांप्रती काँग्रेसचे प्रेम बेगडी तर, शिवसेना संभ्रमित, देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज कृषी विभागाने विकेल ते पिकेल ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. याचनुसार या मोबाईल ॲपमुळे शेतकरीवर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नसून शेतकऱ्यांनी कोणते पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे, कोणत्या पिकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.
ई- पीक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या मोबाईल ॲपचा उपयोग शेतकऱ्यांनाच होणार असल्याने त्यांच्यासाठी हे किती महत्वाचे आहे, हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे. वस्तुस्थितीदर्शक, सद्यस्थितीदर्शक माहिती संकलित करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आली, ही अत्यंत चांगली बाब असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.