मुंबई -गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) नवीन वर्षाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे विकासाची गुढी उभारणार आहेत. एकाच दिवशी विविध ठिकाणी ते जनतेच्या सेवेसंदर्भात उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम करणार आहेत. विशेष करून मागची दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेले, त्यादरम्यान मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत? मंत्रालयात येत नाहीत? मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होत नाहीत? असे विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते. इतकंच नाही तर मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कारभार इतर कोणाकडे तरी सोपवावा, या पद्धतीची मागणीसुद्धा भाजपकडून करण्यात आली होती. आता या सर्वांना उत्तर म्हणून उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत विविध विकासकामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करून विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहेत.
रखडलेली कामे पूर्णत्वास नेऊन उद्घाटन -मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे विविध विकास कामे रखडल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत होती. त्याचबरोबर आत्ताच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या तब्येती वरून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु या सर्वांना एकच उत्तर असं सांगत उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मुंबईतील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे ते विरोधकांना सडेतोड उत्तर देतील. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड उठली होती. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत महाविकास आघाडी केल्याबद्दल सुद्धा भाजप कडून वारंवार मुख्यमंत्री यांना टार्गेट केले जात आहे.
मेट्रो 2 ए व मेट्रो 7 प्रकल्पाचे उद्घाटन -आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मेट्रो 2 ए हा प्रकल्प तसेच मेट्रो 7 या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगाने करण्यासाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गिका प्रकल्प एमएमआरडीए ने हाती घेतला आहे. मेट्रो 2 अंतर्गत दहिसर ते डी एन नगर मेट्रो दोन मार्गिका बांधली आहे. त्याच वेळी दहिसर ते अंधेरी अशी मेट्रो 7 मालकीचे ही बांधकाम झाले आहे. या दोन्ही मार्गिका याआधीच वाहतुक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर तांत्रिक कारणामुळे प्रकल्पास विलंब झाला. यामधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत आहे.
मुख्यमंत्री या प्रकल्पाची गुढी उभारत असताना आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत आहेत असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. गेल्या वर्षी 31 मे रोजी या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर अपुऱ्या सुविधेनिशी मेट्रो सुरू करणारे ठाकरे सरकार म्हणजे आयत्या उभारलेल्या गुढीची पूजा करण्यासाठी उपटलेला अनाहूत यजमान आहे, अशी बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. परंतु अशा पद्धतीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विकासाची गुढी उभारणार आहेत.
मराठी भाषा भवन जागेचे भूमिपूजन -मुंबई, गिरगाव चौपाटी समोर दिमाखदार मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा मध्यंतरी करण्यात आली होती. त्याला मूर्तस्वरूप देण्यात येत असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.