महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray Criticized BJP : 'हा महाराष्ट्र आहे, येथे माज चालत नाही' - अग्नीपथवरुन मुख्यमंत्र्याची टीका

शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमन्यामध्ये जे भिनवले आहे, त्याचा उपयोग काय? हार जीत तर होतच असते. हे महाराष्ट्र आहे. येथे माज चालत नाही. शेरास सव्वाशेर हा मिळतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( Chief Minister Uddhav Thackeray ) भाजपाला ठणकावले आहे. तसेच केंद्र सरकारच्या ( Central Government ) अग्निपथ योजनेवरही सडकून टीका केली. ते शिवसेना वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

By

Published : Jun 19, 2022, 5:12 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषद जिंकण्याचा दावा केला आहे. निवडणुकीची चिंता नाही. ती करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमन्यामध्ये जे भिनवले आहे, त्याचा उपयोग काय? हार जीत तर होतच असते. हे महाराष्ट्र आहे. येथे माज चालत नाही. शेरास सव्वाशेर हा मिळतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( Chief Minister Uddhav Thackeray ) भाजपाला ठणकावले आहे. तसेच केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरही सडकून टीका केली. पवई येथील हॉटेल वेस्ट ईनमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे ( Shivsena Vardhapan Din 2022 ) आयोजन केले होते. दरम्यान, ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन केले आहे.



पक्षासाठी वार झेललेल्यांना अभिवादन :मुख्यमंत्र्यांनी आमदारांना संबोधित करताना शिवसेना स्थापनेवेळच्या अनेक आठवणींना उजाळा देत भाषणाला सुरुवात केली. माझा पक्षच हा पितृपक्ष असून कारण माझ्या पित्याने स्थापन केल्याचे सांगत पितृपक्ष मानत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शिवसेना स्थापनेचा क्षण मनात आठवून गेला. शिवसेना स्थापनेवेळी माझे वय सहा होते. शिवसेना आजवर कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहू. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना विनम्र अभिवादन करत असल्याचे ते म्हणाले.


दगाबाजांना सूचक इशारा :विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रश्न येत नाही. ती आपण जिंकणारच आहोत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नाही. फुटले कोणते? त्याचा अंदाज लागला आहे. कोणी काय काय कलाकारी केली तेही कळाले आहे. हळूहळू या सर्वांचा उलगडा होईल, असे सूचक विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच शिवसेनेत गद्दार मनाचा कोणी राहिला नाही. आपण फाटाफुटीचे राजकारण बघत आलो आहोत. कितीही फाटले फुटलं तरी शिवसेना एक राहिली आहे. शिवाय अधिक जोमाने उभी राहून इतिहासाला दाखवून दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिवाय यावेळी दगाबाजांनाही त्यांनी इशारा दिला आहे.



'आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवणे हीच लोकशाही' :आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. या निवडणुकीत मार्गदर्शन करण्याची गरज नाही. पण आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक, खासदार यांना एकत्रं ठेवणे ही आजची लोकशाही आहे, असा चिमटा भाजपाला काढला. उद्याच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगले चित्र दिसायला हवे. आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मोठी संख्या दिसत आहे. याच संख्येने येत्या विधानसभा निवडणुकीत आपले आमदार निवडून यायला हवेत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.



'शिवसेनेमुळे हिंदुत्वाचा नारा बुलंद' :नुसत्या उद्धव ठाकरेला किंमत नाही बाळासाहेब नाव आहे, म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रांसाठी. काही लोक हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत. ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हते, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है ही विहिंपची घोषणा होती. पण ही घोषणा बोलायलाही कोणी तयार नव्हतं. हिंदुत्व बोलणं हा गुन्हा समजला जायचा. तेव्हा हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने बुलंद केला. आज जे काही चालले आहे ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.


'नाव अग्निपथ, शिकवणार रंधा मारायला' :केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. का आणि कोणी भडकवली त्यांची माथी? शिवसेनेच्या सभेत बोललो होतो हृदयात राम आणि हाताला काम हवे. आज हेच चित्र देशात दिसत आहे. हृदयात राम आहेच, पण प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम म्हणून काही उपयोग नाही. सुरुवातीला नोटाबंदी झाली. लोकांमध्ये भय होते. हुं की चू केलं नाही. निर्णय पचून गेला. शेतकरी कायदे आले. तेव्हा शेतकऱ्यांनी ऐकले नाही. हटून बसले. मग नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावे लागले. आज नवे टुमणं काढल आहे. नोकऱ्यांच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे यांनी मोदींना चिमटा काढला. वचने अशी द्या की ती पूर्ण झाली पाहिजे. शिवसेनेने जे जे वचन दिली ते पूर्ण केली आहेत. दोन कोटी नोकऱ्या देऊ, पाच वर्षात नोकऱ्या देऊ… काहीच दिले नाही. एखादी योजना आणायची अग्निवीर, अग्निपथ योजना. शिकवणार काय तर सुतार काम. गाडी चालवायला, रंधा मारायला शिकवणार पण नाव अग्निवीर, शेलक्या शब्दांत फिरकी घेतली.


'भाडोत्री राज्यकर्त्यांसाठी टेंडर काढा' :चार वर्षासाठी सरकार नोकरी देणार आहे. नंतर नोकरीचा पत्ता नाही. ऐन उमेदवारीच्या वयात शिक्षण नाही. मृगजळ दाखवले जात आहे. लाखोंनी मुले आली तर नेमकी किती मुले कामाला येणार? सर्वात भयानक प्रकार म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? असे असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणू. टेंडर काढा. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आमदार पाहिजे, पंतप्रधान पाहिजे. काढा टेंडर. नाही तरी पाच वर्ष आमचे भाडोत्रीच काम आहे. पाच वर्षानंतर मुदतवाढीसाठी लोकांकडे जावे लागते. एल -1 असेल तर येईल. मध्यावधी आल्या तर आयटम रिओपन होणार. भाडोत्री प्रकार असेल तर सर्वच भाडोत्री ठेवा ना. उगाच काही तरी स्वप्न दाखवायची. तर लोक भडकणार नाही तर काय? असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा -Uddhav Thackeray on Party foundation day : 'आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको...'; मुख्यमंत्री ठाकरेंचा दगाबाजांना इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details