मुंबई- कोरानाच्या संकटातून राज्यात पुन्हा उद्योगधंदे सुरु होत असताना उद्योजक कामगार कपात आणि पगार कपात करत आहेत. महाविकास आघाडी सरकार उद्योजकांच्या अडचणी नक्कीच सोडवेल, परंतु कामगारांच्या हिताची जोपासना त्यांनी केली पाहिजे. पारदर्शकपणे रोजगार निर्मितीच्या कामासाठी आपण प्राधान्य दिले पाहिजे. यामध्ये वशिलेबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. हे महाजॉब पोर्टल बेकारांची नोंद करणारे पोर्टल होता कामा नये. यातून रोजगार मिळालाच पाहिजे, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दिला.
राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की शिवसेनेची स्थापना स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी झाली होती. प्रत्येक संकटात काहीतरी शिकायला मिळतं. कोरोनाच्या संकटांमध्ये काही संधी निर्माण होत आहेत. हे रोजगाराचे माध्यम तयार होते, ती देखील एक संधीच आहे. उद्योगांना कामगार मिळण्याचा आणि कामगारांना रोजगारांच्या संधीची माहिती मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग विभागाचे अभिनंदन केले. हे पोर्टल बेकारांची नोंद करणारे पोर्टल होता कामा नये. यातून रोजगार मिळालाच पाहिजे. देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर महाराष्ट्रात सुरू होत आहे. त्याच धर्तीवर महाजॉब हे सर्वात मोठे पोर्टल प्रथम देशात सुरू होत आहे. जे करु ते भव्यदिव्य करू. सरकार महा विकास आघाडीचे सरकार आहे. त्यातूनच महाजॉब हे महापोर्टल होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
'स्थानिक अधिवास प्रमाणपत्र आवश्यक'
टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगात कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी करोना आजाराच्या संसर्गामुळे कामगारांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी महाजॉब्स हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यात उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाने काम केले आहे. स्थानिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थानिक अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी यावेळी सांगितले.