मुंबई -कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. कोरोनाच्या काळात सर्व कामे बंद असताना या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. कुठलाही अडथळा आला नाही, यामुळे अविरत काम करणाऱ्या कामगारांना धन्यवाद देण्यासाठी मी आलो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेचा व पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. नेपियन्सी रोड येथील अमरसन्स गार्डन, वरळी आदी ठिकाणच्या कामांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाहणी केली, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काय आहे कोस्टल रोड प्रकल्प?
पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी 'शामलदास गांधी उड्डाणपूल' (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते 'राजीव गांधी सागरी सेतू' (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा, म्हणून मुंबईच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असा गाजावाजा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ केला होता. या प्रकल्पाचा खर्च 16 हजार कोटी होता तो आता 20 हजार कोटींच्या पुढे गेला आहे.
काम सुरूच
कोस्टल रोडच्या कामाला पर्यावरणवाद्यांनी, कोळी बांधवांनी विरोध केला. प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात प्रकरण गेले असता या कामाला स्थगिती मिळाली होती. नंतर मात्र नवे काम सुरू न करण्याचा अटीवर काम करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मार्चपासून मुंबईत कोरोनामुळे लॉकडाऊन असताना काही वेळ सोडल्यास कोस्टल रोडचे काम बंद पडलेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 ठिकाणी भेट दिली.