महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Konkan Rain : यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावे; पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली असून, यात पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.

flood
पूरपरिस्थिती

By

Published : Jul 22, 2021, 5:08 PM IST

मुंबई -गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली असून, यात पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच या भागात रेड आणि ऑरेंज अलर्टही जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता श्री तिरमणवार आदींची उपस्थिती होती.

  • मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या आहेत. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशामक दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत, अशी माहिती दिली.

  • बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पाणीपातळीबाबत माहिती देण्यात आली -

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून, सध्या ती ९ मीटर वरून वाहत आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून, ती ७.८ मीटर वरून वाहत आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून, कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदतकार्य जोरात सुरु केले आहे.

रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

  • धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासात ३३६ मिमी पाऊस झाला असून, धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून ते देखील ६३ टक्के भरले आहे. बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला. त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर; अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, पुण्यातून NDRF रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details