मुंबई -राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने हादरा दिला. आघाडीची तब्बल 21 मते फुटली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावली आहे. दुपारी बारा वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत फुटलेल्या मतांवर चर्चा आणि चिंतन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत होणार विचारमंथन -विधान परिषदेच्या 10 जागांपैकी भाजपचे पाच तर महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचा सहावा आणि काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ होते. तरीही तीन मत विभागली गेल्याचे पुढे आले आहे. घटकपक्ष असलेली ९ मतेही फुटली आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सक्त ताकीद दिली असतानाही मत विभागल्या गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे.
शिवसेनेचे घटक पक्ष मिळून 12 तर काँग्रेसची 3 मत फुटली -शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. मात्र शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मते फुटली. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि घटक पक्षांची 9 अशी 12 मते फुटली. तर काँग्रेसचे देखील 3 आमदार फुटले. भाजपच्या प्रसाद लाड यांना मतांचा फायदा झाल्याचे दिसून येते. मात्र देवेंद्र फडणवीस यांची रणनिती आघाडी सरकारपुढे सरस ठरल्याचे दिसून येते.
निकालानंतर मध्यरात्री जोर बैठका -विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मध्यरात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पाठिंबा दिलेले काही अपक्ष आमदार यावेळी उपस्थित होते. यावेळी आघाडीच्या फुटलेल्या मतांवर चिंतन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.