मुंबई - दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या आडून शिवसेनेवर केले जात असलेले राजकीय हल्ले याविषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची वर्षा निवासस्थानी सायंकाळी एक खास बैठक पार पडली.
शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी भाजपाकडून कंगनाचा पुरेपूर वापर केला जात असून यासाठी शिवसेना वेळोवेळी अडचणीत सापडत आहे. त्यातच आज शिवसेनेकडून कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याने शिवसेना बरीच अडचणीत सापडली आहे. यामुळे पवारांनी यासंदर्भात काही राजकीय डावपेच कसे खेळायचे यासाठी शिवसेनेला काही सूचना या बैठकीत केल्या असल्याचे सांगण्यात येते.
शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी कंगना रणौतने केलेल्या ट्विटनंतर आपल्या स्टाइलने प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर कंगनाच्या आडून आणि भाजपाकडून यासाठीचे राजकीय वातावरण तापवण्यात आले. मुंबई आणि महाराष्ट्राचा कंगनाने आपल्या ट्विटमधून अपमान केल्यानंतरही भाजपाकडून कंगनाला अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देण्यात आला. शिवसेनेने कंगनाला मुंबईत येण्यासंदर्भात दिलेल्या धमकीनंतर भाजपाने तत्काळ सुरक्षा पुरविली. यामुळे कंगनाच्या माध्यमातून भाजपाने शिवसेनेला पुरते कोंडीत पकडले. यामुळे मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत यावर बरीच राजकीय खलबते झाल्याचे सांगण्यात येते.