मुंबई -कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची जयंती उत्साहाने साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवारी) बैठक बोलावली होती. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख उपास्थित होते. या बैठकीत महानगरपालिका आणि पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित असून, यासाठी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली जाणार आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव उत्साहाने साजरा करू यात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले. ही खरोखरच खूप मोठी गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
'जयंतीच्या दोन दिवस आधी परिपत्रक काढणार' :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक काढणे, तसेच जयंती साजरी करण्याबाबत जयंतीच्या दोन दिवस आधी परिपत्रक काढले जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. कोरोना काळात विद्यार्थ्यांवर झालेल्या कलम 188 अंतर्गत गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच हिंदु सणांवर राज्य सरकारकडून निर्बंध टाकले जात असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहेत. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, की विरोधकांच्या प्रत्येक आरोपावर उत्तर देण्याची गरज नाही. यासोबत मंत्री असलम शेख यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखल याबाबतचा तक्रार दाखल करण्यात आला असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.