मुंबई - खड्डेमुक्त रस्ते, दर्जेदार शिक्षण, आरोग्य, पाणी टंचाई, पायाभूत सुविधा आणि शहराला भेडसावणाऱ्या नागरी प्रश्नांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. जवळपास साडेतीन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत 'मुंबई व्हिजन 2030' बद्दल चर्चा करण्यात आली.
शहरातील झोपडपट्ट्यांवरील निर्बंधासाठी डेडलाईन, हक्कबाधिकांसह सर्वांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी एकच प्राधिकरण असावे, या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध करुन देण्याबाबत विचारविनीमय केल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी विविध प्रकल्पांचा तसेच 'मुंबई-2030' अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढवा घेतला. यावेळी सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांचे महापालिका आधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर सादरीकरण केले. हवामान खात्याने राज्याच्या किनारपट्टी भागाला दोन वादळांचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या आपत्कालीन विभागात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आर्थिक स्वावलंबन, बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी, पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी भुयारे बांधणे, नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात महापालिकेने केलेली कार्यवाही, बेस्टची व्यवस्था, आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच गारगाई धरण प्रकल्प, मुंबई मलनिःस्सारण प्रकल्प, शहर किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, बेस्टच्या अर्थसहाय्यासाठी विद्युत निर्मिती प्रकल्प या पालिकेच्या नियोजित प्रकल्पांबद्दलचर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याप्रकल्पांचे सादरीकरण केले.
शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई-2030 दृष्टिक्षेप, पूर नियंत्रण व हवामान बदल, एमएमआरडीए आणि एसआरए मधील समन्वय प्रकरणी सकारात्मक चर्चा करुन नियोजनात्मक कामांचे निर्देश दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच मुंबईला 2030 पर्यंत मुबलक पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले प्रस्तावित गारगाई-पिंजाळ प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली, असे त्या म्हणाल्या. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेच्या '500 रुपये बक्षीस योजनेला मुंबईकर, महाराष्ट्रासह इतर राज्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केल्याचे महापौरांनी सांगितले.