मुंबई- राज्यात कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तवला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलवली आहे. दहीहंडी उत्सवाला होणारी गर्दी, लहान मुलांमध्ये वाढू लागलेला कोरोनाचा प्रादुर्भाव यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
आरोग्य यंत्रणांचा धोक्याचा इशारा
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव बरोबर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. राजकीय, व्यावसायिक, उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांच्या हंडी लावण्यात येतात. गेल्या वर्षी कोरोना आला आणि दहीहंडी उत्सवाला ग्रहण लागले आहे. यंदा दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत आहे.
आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावली. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होईल. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील केले असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. पुढे येणारे सण आणि त्यावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. गोविंदा पथकांनी देखील दहीहंडी उत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे बैठकीत करणार असल्याचे समजते. मात्र गोविंदा पथकांच्या प्रतिनिधी हा निर्णय मान्य करतील का, हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.