मुंबई - महाआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या विधानसभेत विश्वासमत ठराव मांडतील. दुपारी दोनच्या दरम्यान हे होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासोबतच उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता या पदांसाठीही निवड उद्याच केली जाणार असल्याचे समजते आहे. तर हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड होणार करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर लाखोंच्या जनसमुदयासमोर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर उद्या उद्धव ठाकरे हे विश्वासमत ठराव सादर करतील, याबाबत माहिती मिळाली आहे. यासोबतच विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या कालीदास कोळंबकर यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली, असे म्हणत फडणवीस यांनी नवीन सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, 'महाविकासआघाडी'तील सत्ता पदाचा घोळ अद्याप संपलेला नाही. आता राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री पदाऐवजी विधानसभेचे अध्यक्ष पद, तर काँग्रेसला अध्यक्ष पदाऐवजी राज्याचे उपमुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. लवकरच याबाबत स्पष्टता येईल, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत लपून-छपून बहुमत सिद्ध करण्यावर चर्चा - फडणवीस