मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना उद्या १६ जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणाची सुरुवात मुंबईच्या वांद्रे येथील बीकेसी कोविड सेंटर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता केली जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.
या ठिकाणी होणार लसीकरण -
कोरोनावर मात करण्यासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा १ लाख ३९ हजार ५०० डोसचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला. उद्या मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, कूपर रुग्णालय आणि बीकेसी जंबो कोवीड सेंटर या ९ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या ९ केंद्रापैकी राजावाडी, कूपर रुग्णालय आणि बीकेसी जंबो कोवीड सेंटर या ३ लसीकरण केंद्रांवर ८ जानेवारीला ड्राय रन घेण्यात आला आहे.
लसीकरणाचे टप्पे -
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सवा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक डॉक्टर, नर्सेस यांना तर दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदीं फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात वय वर्ष ५० पेक्षा पेक्षा अधिक असलेल्या वृद्धांना, विविध आजार असलेल्या रुग्णांना लसीकरण केले जाणार आहे. लस घेताना १२ प्रकारचे ओळखपत्र दाखवून लस घेता येईल. लसीकरण झाल्यावर ३० मिनिट तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली लस घेणारे लाभार्थी असतील. घरी जाऊन काही साईड इफेक्ट आढळले तर पालिकेशी किंवा जवळच्या लसीकरण सेंटरला कॉल करून मदत घेता येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पंतप्रधान साधणार संवाद -
राज्यात ८ लाख तर मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आहेत. ज्यांनी कोव्हीन अॅपवर लसीकरणासाठी आपले नाव नोंदवले आहे. पंतप्रधान उद्या १६ जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मुंबईमधील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात टू वे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी ते लस घेणारे लाभार्थी व लस देणारे डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा -कोरोना लसीकरणाचा आरंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते
हेही वाचा -काँग्रेसचे देशभरात 'राजभवन' घेराव आंदोलन, राहुल गांधी दिल्लीतून करणार सुरुवात