मुंबई : पर्यावरण प्रेमी विरोधामुळे बहुचर्चित असलेल्या आरे येथील मेट्रो कारशेडप्रकरणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आरे मधील मेट्रो कारशेडची जागा बदलून, हे कारशेड गोरेगाव पहाडी भागात उभारण्याबाबत चर्चा झाली. आरे येथील मेट्रो कारशेडला मंत्री आदित्य ठाकरे यांचा विरोध होता. रात्रीच्या अंधारात प्रशासनाने तेथील झाडे तोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कठोर शब्दात टीका केली होती.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्याच दिवशी बहुचर्चित आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. या कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी ४ जणांची समिती नेमण्यात आली होती. आरेमधून मेट्रो कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का? याबाबत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार होती. यासाठी सनदी अधिकारी मनोज सौनिक यांनी अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता.
या समितीने आरेमधील मेट्रो कारशेड अन्य ठिकाणी घेऊन जाणे व्यवहार्य होणार नाही अशी शिफारस दिली असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. आरेमधून मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी बनविण्यात यावे अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात होती. मात्र समितीने दिलेल्या शिफारशीनुसार जर कारशेड अन्य ठिकाणी नेले तर या प्रकल्पाचा खर्च, अनेक तांत्रिक बाबी वाढतील, तसेच मेट्रोच्या कामाला विलंबदेखील होईल त्यामुळे आरेमध्ये कारशेड राहणे योग्य आहे असे सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच आता गोरेगाव भागातील पहाडी भागात कारशेड उभारण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली.