मुंबई- राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला स्थगिती दिली होती. तसेच भाजपकडून पूरग्रस्तांचा आढावा देखील घेण्यात आला होता. सद्यस्थितीत महापूर ओसरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाजानदेश यात्रेला सुरुवात करत आहेत. येत्या २१ ऑगस्टला नंदुरबार येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे, ५१ विधानसभा आणि १३६९ किमी अंतराचा प्रवास झाला असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख आमदार सुरजसिंह ठाकूर यांनी दिली. या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा नंदुरबार ते सोलापूर हा दुसरा टप्पा राहणार आहे.
महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा ११ दिवसाचा आहे. यामध्ये १४ जिल्ह्यातून ५५ विधानसभा आणि १८३९ किमी अंतराचा प्रवास असेल. आधीच्या नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरू होणार होता. मात्र आता यात्रेच्या वेळापत्रकात बदल करून २१ ते ३१ ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर तर विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या एकूण १४ जिल्ह्यातील ५५ विधानसभा मतदारसंघातून तब्बल १ हजार ८३९ किमीअंतराचा प्रवास होणार असल्याचे सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.