मुंबई :पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता, पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द आराखडा आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जलसंपदा विभागाला दिले. राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा (CM Shinde Review Meeting) बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मंत्रालयात (Ministry) झालेल्या या बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भुषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव (बांधकाम) मनोज सौनिक,अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता उपस्थित होते.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश : गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत व बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये, म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल. यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.