मुंबई -पालापाचोळ्यानेच आता इतिहास घडवला असून जनतेला सत्य परिस्थिती माहित आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. शिवसेनेतून पालापाचोळा बाहेर पडल्याने आता शिवसेना स्वच्छ झाली आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
पालापाचोळ्याने इतिहास घडवला - मी योग्य वेळ येताच सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. परंतु, तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या. त्यानंतर आपण एकदाच काय ते बोलू अस मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. त्यांना जर आम्ही पालापाचोळा वाटत असू तर याच पालापाचोळ्याने इतिहास घडवला आहे हे लक्षात ठेवा अस शिंदे म्हणाले आहेत. आपल्या जनतेला माहित आहे आम्ही सत्तेसाठी नाही, तर बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढत आहोत. जनता नक्कीच आमची दखल घेईल असही ते म्हणाले आहेत.