मुंबई- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
आगीची घटनेबाबात कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधीन रुग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही..
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागून अकरा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 20 रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. तसेच मदत आणि बचावकार्यही मोठ्या वेगाने सुरू आहे.
हे ही वाचा -अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग : दोषींवर कडक कारवाई होणार - मंत्री हसन मुश्रीफ