मुंबई -राज्यात नव्याने २३ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित झाले आहेत. उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच पाच अभयारण्य ( sanctuaries ) आणि वारसा स्थळे ( Heritage site ) घोषित केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आज दिली.
हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल - राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित आहे. या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार आहे. तसेच शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
संवर्धन राखीव क्षेत्र - राज्यात मागील अडीच वर्षाच्या काळात जी नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित झाली आहेत त्यामध्ये कोल्हापूर वनवृत्तातील तिलारी, जि. कोल्हापूर (२९.५३) जोर जांभळी-जि.सातारा (६५.११), आंबोली दोडामार्ग (५६.९२)- जि.सिंधुदूर्ग, विशाळगड- जि. कोल्हापूर (९२.९६), पन्हाळगड- जि. कोल्हापूर (७२.९०), मायणी पक्षी संवर्धन-.जि. सातारा, (८.६७), चंदगड- जि. कोल्हापूर (२२५.२४), गगनबावडा- जि. कोल्हापूर (१०४.३९), आजरा भुदरगड – जि.कोल्हापूर (२३८.३३),मसाई पठार –जि. कोल्हापूर (५.३४), नागपूर वनवृत्तातील मुनिया - जि. नागपूर, (९६.०१), मोगरकसा- जि. नागपूर (१०३.९२), अमरावती वनवृत्तातील महेंद्री-जि. अमरावती (६७.८२), धुळे वनवृत्तात चिवटीबारी- जि. धुळे (६६.०४), अलालदरी- जि. धुळे (१००.५६), नाशिक वनवृत्तातील कळवण-जि. नाशिक (८४.१२), मुरागड-जि. नाशिक (४२.८७), त्र्यंबकेश्वर-जि. नाशिक (९६.९७), इगतपुरी-जि. नाशिक (८८.५०), ठाणे वनवृत्तातील रायगड संवर्धन राखीव- जि. रायगड (४७.६२), रोहा संवर्धन राखीव- जि. रायगड (२७.३०), पुणे वनवृत्तातील भोर-जि. पुणे, ( २८.४४), कोल्हापूर वनवृत्तातील दरे खुर्द (महादरे)- जि. सातारा (१.०७), यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री ही ९ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित झाली आहेत.