मुंबई - वांद्रे परिसरात रहदारी वाढली आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत असते. वांद्रे सी-लिंक ते कलानगर उड्डाण पुलांची दुसरी मार्गिका सुरु झाल्यास वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
नव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना दिलासा -
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, माझे बालपण या परिसरात गेले. काही जुन्या आठवणी आहेत. पूर्वी येथे रस्ते मार्ग नव्हते. चालत ये - जा करावी लागायची. कालांतराने रहदारी वाढली. बीकेसी सारखे संकुलही उभे राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
वांद्रे सी-लिंक ते कलानगर उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्धाटन सुसाट प्रवास करता येणार - पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वांद्रे सी - लिंक ते कलानगर जंक्शन येथे तीन मार्गिका असलेले उड्डाणपूल उभारण्याचे काम 2017 पासून सुरु आहे. या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली वरळी बांद्रा सागरी मार्गाकडून बांद्रा-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी बांद्रा-कुर्ला संकुलाकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे. या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा-कुर्ला संकुल ते बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आज दि. २८ जून २०२१ रोजी बांद्रा वरळी सागरी मार्ग ते बांद्रा-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
असा असेल उड्डाणपूल -
कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा वरळी सागरी मार्ग / एस. व्ही मार्ग, सायन/ धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोड रस्त्यासहित इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेळेत साधारण १० मिनिटे बचत होणार आहे.
या कार्यक्रमासाठी नग
रविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते.