मुंबई -जम्मू आणि काश्मीरला स्वायत्तता देणारे भारतीय राज्यघटनेतील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयामुळे स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू झाले आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू; 370 कलमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी
जम्मू आणि काश्मीरला स्वायत्तता देणारे, भारतीय राज्यघटनेतील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी 'नेशन फर्स्ट' ही भावना कृतीत आणण्यासाठी दाखवलेल्या खंबीर नेतृत्वाबद्दल आभार व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात म्हणाले, या निर्णयामुळे खूप दीर्घकाळापासून पाहिलेले स्वप्न आता वास्तवात साकार झाले आहे. या घटनेचे वर्णन करणे शब्द आणि भावनांपलीकडचे असून या क्षणाची मला दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. महान नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी याच उद्देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. जम्मू आणि काश्मीरच्या एकात्मतेसोबत विकासासाठी देखील हे अगदी अचूक पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न साकार झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी 'नेशन फर्स्ट' ही भावना कृतीत आणण्यासाठी दाखवलेल्या खंबीर नेतृत्वाबद्दल आम्ही आभारी आहोत.