पुणे - मागील काही दिवासांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर काल ( 30 जून ) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ( Eknath Shinde Oath CM ) घेतली आहे. मात्र, त्यांच्या शपथविधीनंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता न मिळता, तसेच कुठेही विलीनीकरण न करता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याबाबत आता घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी 'ईटिव्ही भारत'ने संवाद साधला आहे. शिवसेना हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष ( Uddhav Thackeray) आहे. त्यातून बाहेर पडलेला गट हा कायद्याच्या दृष्टीने शिवसेनेचा नाही. तसे, असताना जर दोन तृतीयांश बाहेर पडले हे मान्य झालं, तर त्यांना विलीनीकरण व्हावं लागेल. पण, असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे आताचे मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) कोणत्या पक्षाचे, असा सवाल बापट यांनी उपस्थित केला आहे.
उल्हास बापट म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये राज्य घटनेच उल्लंघन हे खूप जास्त वेळा केला गेलं आहे. किंबहुना राज्य घटनेला धाब्यावर बसवल गेलं आहे. राज्यघटनेच्या 163 कलम खाली मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असतो. पण, असं असताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात देखील घेतलं नाही. तसेच, यात अजून संशयास्पद काय तर विरोधी पक्ष नेते जेव्हा राज्यपालकडे जातात तेव्हाच एक पत्र बाहेर येते. याचाच अर्थ असा होतो की हे काही आधीच ठरलेल्या गोष्टी होत्या का?, असा सवाल उपस्थित होत आहे.