मुंबई -आजपासून महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शिंदे-फडणवीस सरकार विरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळाल. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून विरोधकांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. सत्तेत येताच आमदारांची दादागिरीची वक्तव्ये, अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न झालेली मदत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. सभागृहात पहिल्या दिवशी फारशी खडाजंगी झालेली नसली, तरी विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राडेबाज आमदारांना समज दिली आहे. विशेष करून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर व प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या करामतींमुळे मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी धारेवर cm eknath shinde summons santosh bangar धरले.
काय झाले होते? -कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचं सांगत हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. उपहारगृहाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या बांगरांची तेथील जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून सटकली अन् त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाला थोबडवलं. संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. यावर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना धीराने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. प्रश्न जरी बरोबर असला तरी तुमच्या रिअॅक्ट करण्याची पद्धत बरोबर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना समजावलं. तसेच, यापुढे असे प्रकार टाळते आले तर पाहा, अशी सूचनाही केली.
'वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे' - विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपलं सरकार कसं चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा, असे आदेश देतानाच आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्याकडून कोणतंही चुकीचं वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.